दसरा उत्सव

अश्विन शुक्लपक्ष नवमी, म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी श्री. सिध्दनाथाचा छबिना निघतो.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी विजया दशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देवळात दसरा मोहोत्सव साजरा केला जातो. ह्या दिवशी चर्मकार (कांबळे) समाज सासनकाठी घेऊन देवळाच्या परिसरात आणतात. ही सासनकाठी फुलांनी सजवलेली असते. भक्तगण हि सासनकाठी आपल्या खांद्यावर घेऊन, वाजत गाजत, देवाची हाक (हाळी) देत मंदिर परिसरात आणतात. देवाची पालखी देवळाबाहेर आल्यावर पालखी व सासनकाठी पळवण्याचा मोठा नयन्यरम्य सोहळा होतो. देवाची पालखी गावच्या वेशीबाहेर (वाळके ह्यांच्या शेतामध्ये) विसावते. ह्या दरम्यान आपट्याच्या पानांची पूजा पाटील समाजाकडून केली जाते व त्यानंतर सर्व समाज एकत्र येउन सोने (आपट्याची पाने) लुटण्याचा सोहळा साजरा करतात. सर्व समाजातील भक्तगण देवाला आपट्याची पाने व कणीस वाहून देवाचा आशिर्वाद घेतात. श्रीची पालखी (छबिना) पुन्हा मंदिराजवळ आल्यावर त्यांना कांबळे व माने समाजाच्या महिला भगिनी ओवाळतात, तेथून ती थोरला वाडा (बाबर वाडा) येथे विसावते. येथे बाबर वाड्यातील महिला भगिनी देवाची ओवाळणी करतात. त्यानंतर बिरोबाच्या मंदिराजवळ ह्या ठिकाणी पालखी विसावते. येथेहि देवाची आरती झाल्यावर श्री. सिध्दनाथाची पालखी मंदिराकडे मार्गस्थ होते. मंदिरात परत आल्यानंतर देवाची आरती होऊन सर्वाना देवाचा प्रसाद दिला जातो.

श्री. सिध्दनाथाचे दर्शन कार्तिक कृष्णपक्ष सप्तमी (आश्लेषा नक्षत्र) या दिवशी झाले, म्हणूनच श्री. सिध्दनाथाचे भक्त हा दिवस एका उत्सवाच्या स्वरुपात साजरा करतात. सर्व मंदिर परिसराला विद्दुत रोषणाई केली जाते. बरोबर रात्री १२ वाजता देवावर फुले टाकून त्याचा प्रकटोत्सव साजरा केला जातो.
देवाच्या ह्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी रड्डे, घेरडी, वाकी, मेथवडे, शिरभावी, खर्डी येथील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.