५०० वर्षापूर्वीपासून एक मूर्तीसारखी दिसणारी दगडाची शिळा आलेगावात होती. त्यावेळी आलेगाव हे गाव नसून फक्त घनदाट जंगल होते. सध्याचे आलेगाव व वाकी याच्या सरहद्दीवर गवळीवाडी नावाचे लहानसे गाव होते. त्या गवळीवाडीतील चांभार समाजाची व सोबत इतर समाजातील लहान-मोठी मुले आपआपली गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या राखण्यासाठी व चारण्यासाठी या जंगलात येत असत. फिरता फिरता त्या गुराखी मुलांच्या नजरेला ही शिळा आली. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या शिळेलाच ती मुले देव मानू लागली. दररोज दुपारच्या जेवणापुर्वी या मानलेल्या देवाला नैवैद्य दाखवूनच ही मुले भोजन करीत असत. कुणावर काही संकट आले की ही मुले या मानलेल्या देवाला सांगत आणि त्यांची संकटे दूर होत असत. अशा अनेक चमत्कारांमुळे त्या गुराखी मुलांचा भक्तीभाव वाढून या देवावर त्यांची श्रद्धा बसली व दिवसेंदिवस ती वाढू लागली. तेच हे श्री. सिध्दनाथ होय.

देवाला श्री सिध्दनाथ हे नाव कसे पडले

देवाला श्री सिध्दनाथ हे नाव कसे पडले याविषयीची एक दंतकथा आहे. पुराणामध्ये सोनासुर नावाचा राक्षस होता. तो खूप माजला होता. तो देवादीकादी सर्वांना त्रास देत असे. काशी विश्वनाथाने जगाच्या कल्याणासाठी यज्ञ सुरू केला. त्या यज्ञात सोनासुर राक्षसाने (दैत्याने) अडथळे आणल्याने यज्ञ बंद पडला. काशी विश्वनाथाला (भगवान शंकराला) राग आला व आपल्या तिसर्‍या डोळ्यातून श्री काळभैरवाची उत्पत्ती केली. त्या काळभैरवाने सोनासुर दैत्याचा वध केला. ते ठिकाण म्हणजे परांडा तालुक्यातील सोनारी हे गांव होय. त्यामुळे काळभैरवाला 'सोनारसिद्ध’ असे नांव पडले.

काळभैरव श्री सिध्दनाथ हे सोनारी येथुन एका भक्ताच्या अथांग भक्तीमुळे माण नदीच्या काठी असलेल्या म्हसवड या गावी आले. येथुन "नाईकबा" या भक्तामुळे ते खरसुंडी या गावी आले. त्यानंतर "श्री सिध्दनाथ" हिंडत फिरत, रमत गमत ते "आपरूपा" ह्या नदीच्या काठी एका गोल शिळेच्या रुपात गुप्त झाले. कालांतराने त्यांनी त्या लहान मुलांना दर्शन दिले. त्या मुलांची भक्ती व श्रद्धा पाहून ते तेथेच वास्तव्य करू लागले. तेच हे "श्री. सिध्दनाथ" होय.

आदिलशाही सरदारांच्या नवसाला देव पावला.

एके दिवशी गवळीवाडीतील गुराखी मुले भोजन करून देवापुढे भजन म्हणत बसली होती. दगडांच्या टाळाच्या नादावर एक चांभाराचा मुलगा टीरीवर चापट्या मारुन आवाज करीत नाचत भजन म्हणत होता. त्याचवेळी विजापूरच्या आदिलशहाचा खजिना पाच उंटावर लादून कल्याणहून विजापुरकडे निघाला होता. त्या खजिन्याच्या रक्षणार्थ काही मोगल सरदार व सैनिक सोबत होते. चालत चालत या जंगलाच्या वाटेने येत असता, दमल्यामुळे प्रवासाचा शिण घालवण्यासाठी ते सरदार व सैनिक एका झाडाखाली हुक्का पित बसले व उंटाना जवळच चरावयास सोडले. ते उंट चरत चरत आपरूपा नदीच्या कडेकडेने भलतीकडेच गेले व दिसेनासे झाले. काही वेळाने सैनिक उठून पहातात तो उंट गायब झालेले. सरदारांनी सगळीकडे शोध घेतला पण उंट काही सापडेनात. फिरता फिरता त्या सरदारांची नजर एका झाडखाली बसलेल्या गुराखी मुलांकडे गेली व त्यांना हरवलेल्या उंटाबद्दल विचारले. पण मुलांनाही काही सांगता येईना. शेवटी सर्व सरदार व सैनिक हताश होऊन खाली बसले व आदिलशहा आपल्याला कठोर शिक्षा करणार म्हणून रडू लागले. त्यांची केविलवाणी अवस्था पाहून गुराखी मुले म्हणाली, आमचा एक देव आहे. त्याला जर नवस बोललात तर तुमचे उंट परत मिळतील. फक्त आमच्या देवाला सावली करा. लगेच ते सरदार शिळेजवळ येऊन नवस बोलले की, "आम्ही तुमचे मंदिर बांधू, पण आमचे उंट परत मिळू द्या." नवस बोलताच त्या सैनिकांना त्यांचे उंट जवळच्याच बांधाजवळ लिंबाच्या झाडाजवळ सापडले. आजही लोक ह्या ठिकाणाला "उंटवाल्याचा बांध" अथवा "लिंब" असे संबोधतात. त्या सरदारांनी देवापुढे मस्तक झुकवून उंटाना घेवून विजापूरला निघून गेले. इकडे गुराखी मुलांना मात्र खूप आनंद झाला. हा देव मनातल्या इच्छेला सिद्ध आहे, म्हणून सर्व लोक त्यास " सिध्दनाथ” असे म्हणू लागले. विजापूरच्या आदिलशहाला हरवलेले उंट एका हिंदू देवाच्या कृपेने परत मिळाले ही कहाणी समजली व त्वरीत तेथे मंदिर बांधा असा हुकुम केला. त्यानुसार त्या शिळेवर मुसलमानी पद्धतीप्रमाणे घुमट (शिखर) असलेले मंदिर बांधण्यात आले. त्यानंतरच्या काळात मोगलराजे हिंदुची मंदिर तोडून तेथे मस्जिद बांधीत असत. त्याकाळी पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, जवळागावचे नारायण देव ह्या मंदिरांची विटंबना केली गेली. पण ह्या मंदिराचा घुमट पाहून ती मस्जिद आहे असे समजून मोगलराजांनी या मंदिराला हात लावला नाही. आपला सिध्दनाथ व मंदिर सुरक्षित राहीले. विजापूरच्या आदिलशहाने मंदिर बांधून देईपर्यंत श्री. सिध्दनाथाची पूजा चर्मकार समाज करत होता. परंतु पुढे देवासाठी गुरव नेमल्यामुळे ही प्रथा बंद पडली.

गावाला आलेगाव नाव कसे पडले.

श्री सिध्दनाथ हे नवसाला पावतात अशी ख्याती झाल्याने गवळीवाडीतून काही चांभार मंडळी व इतर वाड्यावरून इतर समाजाची गावकरी मंडळी या मंदिराच्या जवळ आली व स्थायिक झाली म्हणून हे आले, ते आले व सिध्दनाथ ही आले यावरून गावाला आलेगाव असे नाव इतर लोकांनी व आदिलशाही सरदारांनी दिले.
दुसर्‍या दंतकथेनुसार पुर्वी सध्याचे हतीद, सोनंद, डोंगरगाव इत्यादी गावे म्हणजे लहान लहान वाडया होत्या. एकदा प्लेगसारख्या रोगाची साथ ह्या पंचक्रोशीत आली. या आजारात माणसाचा मृत्यु हा ठरलेलाच असायचा. त्यामुळे घाबरून लोकांनी वाड्या-वस्त्या सोडल्या व श्री सिध्दनाथाच्या आश्रयाला या जंगल भागात आले. येथे घनदाट जंगल होते. निवडुंगाचे रान होते. या आलेल्या लोकांनी निवडुंग जाळून, जंगल हटवून वस्त्या केल्या. बाहेर गावाहून लोक या सिध्दनाथाजवळ आले. म्हणून या गावाला आलेगाव असे नाव पडले. श्री सिध्दनाथाच्या सत्वामुळे याच भागाला नाथांची पंढरी असेही लोक म्हणत असत. पण काही काळानंतर अपभ्रश होऊन "नाथांची पांढरी” असे लोक म्हणू लागले.

बाबरांचे गाव – आलेगाव

सुमारे ४०० वर्षापूर्वी श्रीमंत शहाजी राजानी श्री. महीपतराव बाबर व श्री. हैबतराव बाबर या सख्या भावांना आलेगाव, डोंगरगांव, सोनंद, खूपसंगी या चार गावांची सरंजामी दिली. सध्या गावात बाबर, कांबळे, लवटे, वाळके, मेटकरी, नाईक, दिवशे, मोरे, गायकवाड, पाटील, माने, गडहिरे, नवघरे, जाधव, स्वामी (जंगम), शिंदे, कुंभार, फुलारी, दोडकुले, मुलानी, डवरी इत्यादी सर्व समाजातील व सर्व धर्मातील लोक भांडणतंटा न करता "श्री सिध्दनाथाची" सेवा करीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत.