श्री सिध्द्नाथाच्या यात्रेचे स्वरुप

श्री सिध्दनाथ यात्रेची सुरुवात चैत्र शुद्ध व्दादशीला देवाला हळद लाऊन करण्यात येते, त्याला तेल लावणे असे म्हणतात. त्यावेळी चवरी ढाळण्यासाठी नाईक, जाधव हे मानकरी येतात. म्हेत्रे (माळी) हे हळदीचे बाशिंग (फुलांचे हार) घेऊन येतात. श्री सिध्दनाथ व जोगेश्वरी देवी यांना फुलांचे बाशिंग बांधून वाघमारे (परीट) व माळी समाजाच्या महिला देवाला देवाला तेल चढवण्याची गाणी म्हणतात. मानाच्या सासनकाठ्या घेऊन मेटकरी येतात. देवाच्या संपूर्ण अंगाला तेल लावले जाते. त्यावेळी चर्मकार (कांबळे) समाजाच्या सुवासिनी देवाला पंचारती घेऊन ओवाळतात व नंतर घुगऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. चैत्रपोर्णिमेला देवाची घटस्‍थापना केली जाते. चैत्र वद्य अष्टमीला देवाला सिंहासनावर बसवले जाते. त्या दिवशी संपूर्ण आलेगावात देवाचा उपवास केला जातो. याच दिवशी देवाच्या पायात नविन जोड़ा घातला जातो.

आलेगावच्या श्री सिध्दनाथ यात्रेचा कालावधी चैत्र वद्य अष्टमी ते चैत्र वद्य व्दादशी असा पाच दिवस असतो. अष्टमीच्या दिवशी श्री सिध्द्नाथाचा विवाह आंबेज़ोगाई, जिल्हा बिड़ येथील जोगेश्वरी देवीबरोबर सायंकाळी ५.०० वाजता लावण्यात येतो. यावेळी सर्व गावकरी देवावर अक्षता टाकण्यासाठी हजर असतात. अष्टमीला देवाची पूजा बांधली जाते. अष्टमीच्या दिवशी श्री सिध्दनाथाचा छबिना निघतो. हा छबिना येताळबा, मरीआई, श्री विठ्ठल मंदिराला वेढा घालून मंदिरात आणला जातो.

नवमीला श्री सिध्दनाथाला घोड्यावर बसवले जाते. ह्या दिवशीही देवाचा छबिना काढला जातो.

दशमीला देवाची मिरवणूक हत्तीवर निघते. नेहमीप्रमाणे देवाचा छबिना निघून तो संपूर्ण मदिर परिसरात फिरवला जातो. संध्याकाळी छबिना मंदिरात आल्यावर देवाला आंघोळ घातली जाते व त्यानंतर आरती केली जाते.

एकादशीला श्री सिध्दनाथाला नंदीवर बसवले जाते. नेहमीप्रमाणे पहाटे देवास स्नान घालून काकड आरती होते. ह्या दिवशीही देवाचा छबिना काढला जातो.

व्दादशीला सकाळी रथामध्ये बसविले जाते व संध्याकाळी चांदीच्या पालखीत बसवुन मिरवणुक निघते. डोक्यावर फेटा, हातामध्ये चाबूक व पायामध्ये चामड्याचा जोडा घालून श्री. सिध्दनाथ ढोल, ताशे, सनई, हलगी व टाळ ह्यांच्या गजरात सर्वाना दर्शन देतात. श्री. सिध्दनाथाची पालखी मंदिराच्या बाहेर येताच गुलाल, खोबरे, खारीक ह्यांची उधळण होते. पाचव्या दिवशी म्हणजे चैत्र वद्य द्धादशीला आरेवाडीचा श्री. बिरोबा देव व आलेगावचा श्री. सिदोबा देव (श्री. सिध्दनाथ) यांच्या पालख्यांची रात्री १२ वाजता भेट होते. श्रीची पालखी येताळबा व मरीआई ह्यांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पहाटे मंदिरात परत येते व यात्रेची सांगता होते. चौकधुनी (प्रक्षाळपूजा) ह्या दिवशी देवाची सोळावी होते. ह्या दिवशी मंदिराच्या पुजाऱ्याकडून सर्व मानकरी व देवाचे इतर सेवक ह्यांना पुरण-पोळीचे जेवण दिले जाते.

श्री सिध्द्नाथ देवाच्या यात्रेचे मानकरी

श्री सिध्दनाथाच्या यात्रेचे मानकरी बाबर, कांबळे, पाटील, दिवसे, बुरजे, लवटे, वाघमारे (माळी), म्हेत्रे (माळी) वाळके, जाधव व नाईक हे आहेत. श्री. सिध्दनाथाच्या प्रेरणेने व या सर्वांच्या सहकार्याने यात्रेचा सोहळा आनंदाने होतो. पालखीच्या वेळी शोभेचे दारूकाम होते. फटाके वाजवतात व वाजत गाजत गुलाल-खोबरे उधळत " श्री सिध्द्नाथाच्या नावानं चांगभलं " असा गजर करीत पालखी सोहळा पूर्ण होतो. यात्रा काळात भक्तांसाठी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीतर्फे शुद्ध पाणी, दिवाबत्ती यांची सोय करण्यात येते. अनेक दुकाने, पाले येतात. गरमागरम भजी, वडा व चहा बरोबर शेवगाठी, पेढे यांची दुकाने येतात. मुलांची खेळणी व जीवनोपयोगी वस्तुंचे स्टॉल लागतात. पुर्वी यात्रा संपल्यावर रात्री भक्तांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा फड असायचा.

श्री सिध्द्नाथाला चर्मकार समाजाचा मान

श्री सिध्दनाथ यात्रेसाठी चर्मकार (कांबळे) समाजाचा मान खूप मोठा आहे. चर्मकार (कांबळे) समाजाच्या वतीने सासनकाठ्या घेऊन निघाल्याशिवाय यात्रा सुरू होत नाही. प्रथम मान त्यांचा आहे. श्री सिध्दनाथ व जोगेश्वरी देवी ह्यांच्या विवाहदिनी म्हणजे चैत्र वद्य अष्टमीला चांभारसमाज सासनकाठीला स्वच्छ धुऊन त्याची पूजा करतात. सासनकाठीला नेवेद्य दाखवल्यावर, नाईक व जाधव समाजाला बरोबर घेऊन सर्व लोक मंदिरात येतात. नंतर ही सासनकाठी मंदिराच्या समोर उभी करून त्यावर रोषणाई करण्यात येते. चांदीची काठी हाती घेऊन चोपदाराचे काम लवटे यांच्याकडे आहे. तर देवावर चवरी ढाळण्याचे काम जाधव व नाईक यांच्याकडे आहे. अशा प्रकारे सर्व समाजाकडे वेगवेगळ्या स्वरूपाची कामे सोपवून देवाची सेवा करण्याचा अधिकार दिला आहे. पालखीच्या दिवशी रात्री देवाच्या पालखीला मार्ग दाखविण्याचे काम हाती दिवट्या घेऊन कांबळे समाज व माळी, दिवसे, सुतार समाज इमाने इतबारे करीत आहेत. शिवाय पालखी जाताना रस्त्यावर पालखी खाली कांबळ (घोंगडे) अंथरण्याचे काम सुद्धा कांबळे समाजच करतो.