आलेगावचे श्री सिध्दनाथ मंदिर हे दक्षिणभिमूख असून परसदार पूर्वाभिमूख आहे. चारही बाजूंनी दगडी बांधकाम असून कमानीयुक्त अठरा ओवर्या आहेत. गाभार्याचा दरवाजा लहान असून वाकून नतमस्तक होऊनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो. सध्या फक्त पुजारी (गुरव) समाज गाभार्यात जाऊन पूजाअर्चा करतात. श्री सिध्दनाथ मंदिराच्या बाजूला आई मरीआई, श्री. विठोबा, श्री. बिरोबा, श्री सोनारसिद्ध, श्री हनुमान, श्री महादेव यांची सुद्धा मंदिरे आहेत. त्यामुळे या परिसरात आल्यानंतर मनाला एक प्रकारचा सात्विक आनंद होतो. चाळीस वर्षापूर्वी मंदिरासमोर २५ फुट रुंद व ३० फुट लांबीचा सभामंडप बांधण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या भक्तांची चांगली सोय झाली आहे. तसेच २३ वर्षापूर्वी मंदिरावरील घुमटावरच भव्य शिखराचे (कळसाचे) बांधकाम केले आहे. हे सभामंडप, कळस शिखराचे काम हे कांबळे, बाबर इ. सर्व समाजाच्या लोकवर्गणीतून ही कामे (बांधकाम) झालेली आहेत. आदिलशहाच्या काळात श्री. सिध्दनाथाच्या मंदिर बांधकामाला परवानगी व बांधकामाचा खर्च आदिलशाहाकडुन करण्यात आला. त्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, पेशव्यांचा काळात किंवा आताच्या राज्य शासन व केंद्र शासनाकडून मंदिराला कोणतेही अनुदान मिळाले नाही. यात्रेचा सर्व खर्च व पूजाअर्चा, दिवाबत्तीचा खर्च हा लोकवर्गणीतुन केला जातो. म्हणुनच भक्तांना देव आपला वाटतो.
सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील सिध्दनाथ, परांडा तालुक्यातील सोनारसिद्ध, माण तालुक्यातील म्हसवडासिद्ध व मोहोळ तालुक्यातील अंकोलिसिद्ध हे सर्व बरोबरीने असून हे सर्व भैरवनाथ एकच आहेत. या सर्व सिध्दनाथांची यात्रा एकाच दिवशी म्हणजे चैत्र वद्य अष्टमीला सुरू होऊन, चैत्र वद्य द्वादशीला सोहळा होऊन यात्रेची समाप्ती होते.
पुर्वी देवासाठी सागवानी लाकडाची पालखी होती. परंतु आता रावसाहेब माधवराव बाबर यांनी खास चांदीची पालखी करून घेऊन श्री. सिध्दनाथ चरणी अर्पण केली आहे. याच पालखीतून श्री सिद्धनाथ सोहळ्यासाठी निघतात.
श्री सिध्दनाथ हे चामड्याचे जोडे घालतात व हातात कोरडा (चाबुक) घेऊन घोड्यावरून क्षेत्ररक्षण व भक्तांचे रक्षण करतात. भक्ताची अशी श्रद्धा आहे की वर्षभरामध्ये वापरल्याने देवाचे जोडे झिजतात म्हणून कांबळे (चर्मकार) समाज दरवर्षी देवाला नविन जोडा व कोरडा (चाबुक) तयार करून देवाला अर्पण करून धन्य होतात.