मंदिरातील नित्यनियमाचे कार्यक्रम

मंदिरात घोड्यावर बसलेली श्री सिध्दनाथाची मूर्ती असून, मूर्तीसमोर देवाचा मुकुट आहे. देवाच्या डाव्या बाजूला आईसाहेब जोगेश्वरी देवीची मुर्ती आहे. श्रींची आरती दिवसातून दोन वेळा होते. पहाटे ४.३० वाजता देवाची अंघोळ व काकड आरती व रात्री ८.०० वाजता देवाच्या आरतीचा कार्यक्रम अविरतपणे सुरु आहे. रविवार हा देवाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी रात्रीची आरती ८.३० वाजता होते. मंदिरामध्ये दररोज पहाटे चार वाजता नगारे, ढोल, ताशे वाजवून काकड आरती केली जाते. नंतर मंदिराचा पुजारी (गुरव) देवाची षोडशोपचार पूजा करतो. या षोडशोपचार पूजा विधीत चर्मकार (कांबळे) समाजाला मान असतो. शिवाय डवरी, घडशी या समाजाबरोबर इतरही सर्व समाजाचे लोक आस्थेने येतात व पूजाविधी सोहळा अनुभवतात. देवाच्या झेंड्याची काठी कर्नाटकाहून बांबूच्या बनातून सर्वात उंच भरीव बांबूची आणतात. श्री सिध्दनाथाला पुरणपोळी, खीर, पेढे, भाजी - भाकरी असा गोडा नैवेद्य दाखवला जातो. तर यात्रेमध्ये मंदिराच्या बाहेर दैत्यासाठी बकर्‍याचा बळी दिला जातो. आजची नवीन पिढी शिक्षणाने सुशिक्षीत व सुसंस्कृत झाल्याने बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा कमी होत चालली आहे. "देव हा भावाचा भुकेलेला आहे. त्याला फक्त तुमच्या मनातला सात्विक भाव दया. रोज भक्तीने नामस्मरण करा, पूजा करा. देव तुमच्या संकटाला धावून आलाच पाहिजे. कारण तो तुमच्या हृदयात आहे." हीच आजच्या नवयुवक व नवयुवतींची धारणा आहे.

भांग बनविण्याची रीत

मंदिरामध्ये प्रसाद म्हणून भांग वाटली जाते. दर रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला देवळात भांग बनवण्याचा कार्यक्रम होतो. देवळातले गुरव ही भांग बनवतात.
भांग बनवण्यासाठी खसखस, खारीक, खोबरे, वेलची, सुंठ, बडीशेप, काळीमीरी अशा सर्व वस्तु प्रत्येकी १० ग्रॅम बारीक वाटून एक लिटर पाण्यात मिसळाव्यात. त्यात जरुरी पुरता गूळ टाकावा. सर्व वस्तू पाण्यात पूर्ण मिसळल्यावर भांग तयार होते. या भांगेचा देवाला नैवेद्य दाखवतात व नंतर हिच भांग प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात येते.

786 satta king